Spread the love

महसूल विभाग – प्रशासनाचा कणा

वाढवण्यात आलेल्या lockdown काळात प्रत्येकाच्या जबाबदारीचा आढावा घेत असताना ….एक सहकारी मला म्हटला …..साहेब तुम्ही दिलेले काम सकाळी 8 पासून सुरू केल तरी रात्री घरी जाई पर्यंत संपत नाही…..अन घरी पोरं विचारताय की तुम्ही नक्की काय करता ….तुमचं तर कुठे नाव नाही जसे facebook whatsapp वर तुमचे कामाविषयी तर कोणी चर्चाच करत नाही….
मग असे जर असेल तर मग आपलं कौतुक कधी होणार…..आपल्या विभागाचे नाव कधी होणार.
प्रश्न बरोबर होता…..पण विचार करायला वेळ नव्हता त्यामुळे त्यांना म्हटलं उगाच काहीही विषय काढून कामाकडे दुर्लक्ष करू नका….. आणि असल्या कौतुकाने काय होतं….काम महत्वाचं … ते पूर्ण करा……ते गेले. पण तो विषय मात्र डोक्यात राहिला.

मग मी माझ्या त्यांना द्यायच्या सुचनांचा कागद बघितला……

1. रेशन दुकानात धान्य गेले आहे. त्याचे वाटप सकाळी 8 वाजल्यापासून सुरू करायचे. त्यासाठी social distance ठेवले जाण्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे.
2. ज्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये आहे पण त्यांचे ऑनलाईन न झाल्यामुळे रेशन मिळालेले नाही त्यांची यादी तयार करा.
3. सीमावर्ती भागांत इतर राज्यातून मजूर आलेले आहेत त्यांची यादी तयार करा यात ते कोणत्या कंत्राटदाराकडे काम करतात याची नोंद आवश्यक.
4. कुशल कामगार असतील तर त्याची नोंद करा वैयक्तिक काम देण्यासारखे असेल तर तसे वेगळे नमूद करावे.
5. रोजगार हमी वर काम करण्यासाठी गावात किती व्यक्ती इच्छुक आहेत आणि कोणती कामे घेता येतील याबाबत अहवाल द्या.
6. कोरोना ग्रस्त भागातून ज्या व्यक्ती आल्या आहेत त्यांची सोय ZP शाळेत करण्यात यावी त्यासाठी आवश्यक ती स्वच्छता करून light व पाण्याची सोय करा.
7. त्यांच्या वैद्यकीय तपासणी साठी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे सदर तपासणी झालेनंतर कोणत्याही व्यक्तीला विलगिकरण करावयाचे असेल तर ते कळवावे.
8. ज्या व्यक्तींना रोजगार नसल्याने आणि येथील रेशन कार्ड नसल्याने धान्य मिळेलेले नाही त्यांचेसाठी तयार करण्यात अलेल्या फूडकीट चे वाटप करावे.
9. अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर आणि इतर कर्मचारी याना मास्क पुरवठा करणेसाठी बचत गटाकडून मास्क बनवून घेतले आहेत त्याचे वाटप करावे.
10. बँकेत शेतकऱ्यांचे पैसे काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून समोर आवश्यक असेल तर मंडप टाकून बॅरिकेडिंग करावे जेणेकरून व्यक्ती एकमेकांपासून अंतर ठेऊन उभ्या राहू शकतील.
11. कोणताही दुकानदार जर जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करीत असेल तर त्याबाबत अहवाल द्यावा आवश्यकता असेल तर परवानगी घेऊन गुन्हा दाखल करावा.
12. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कोणी वाढवून विक्री करीत असेल तर त्यावर कारवाई करावी.
13. जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी साठी एकाच वेळी लोक रस्त्यावर येऊ नयेत या साठी दिवसनिहाय पास दिलेले आहेत त्यांचे वितरण झाल्या बाबत तपासणी करावी.

ह्या सूचना सर्वासाठी होत्या त्या व्यतिरिक्त गाव निहाय वेगवेगळ्या सूचना होत्या……जसे कुठे रेशन चा ट्रक बंद पडला होता……काही ठिकाणी टँकर ची मागणी होती….पाणी पुरवठ्यासाठी विहिरीचे अधिग्रहन करायचे होते……काही शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्याला द्यायचा होता……या आणि अशा अनेक कामांची यादी होती…..

मग म्हटलं काम तर भरपूर आहे आणि सगळे करताय देखील पण ते करत असलेल्या कामाची लोकांना जाणीव नाही ….कोणी कौतुक करत नाही असे वाटून ते नाराज झाले होते.

विचार केला तर वाटलं की खरं आहे …असे अनेकांच्या मनात येणे शक्य आहे….पण मी या सर्वांना आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो की महसुल विभाग स्थानिक पातळीवर सामान्य प्रशासनाचे काम करीत असतो. तेथील तो लोकांसाठी प्रत्यक्ष शासन असतो. विविध विभागांना त्यांचे काम करणे शक्य व्हावे म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी पूर्ण करतो.

कामाच्या ओघात आपण जे काय करतो त्यामध्ये

lockdown मुळे बेरोजगारीचा फटका बसलेल्या अनेकांच्या घरात चूल पेटण्यापासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या यंत्रणेला सुविधा पुरवण्या पर्यंत…..

बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीसांना निवाऱ्याची चहा नास्ताची सोय करण्यापासून ते ग्रामपंचायतीची बिघडलेली पाणीपुरवठा करणारी मोटर दुरुस्त करून देण्या पर्यंत …..

ILI आणि SARI च्या रुग्णासाठी वेगळे PHC पातळीवर हॉस्पिटल बनवण्यासाठी एखादी शासकीय इमारत ताब्यात घेऊन तिचे निर्जंतुकीकरण करून 10 वेगवेगळ्या ठिकाणावरून त्या ठिकाणी आवश्यक साहित्य वाहून नेण्यापासून ते डॉक्टरांच्या OPD साठी विलगिकरनाची वेगळी व्यवस्था करण्यापर्यंत….

वेगवेगळ्या ठिकाणावरून येणाऱ्या मजुरांची गावात वेगळी राहण्याची सोय करून त्यांना आवश्यक किराणा पोच करण्यापासून ते गावातील लोकांना त्यांचेवर बहिष्कार टाकू नये म्हणून मध्यस्ती करण्यापर्यंत…..

लोकांच्या मनातील आजाराविषयी शंका दूर करीत त्यांना घरात राहण्याचे आवाहन करून आपल्या गावाची काळजी घेणेसाठी उपाययोजना सांगण्यापासून ते त्याच गावातील लोकांनी गावाच्या रक्षणासाठी केलेल्या नाकेबंदी मुळे कोणत्याही गरोदर महिलेला रुग्णालयात जाण्यास त्रास होऊ नये म्हणून त्याबाबत आधीच यादी तयार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्या पर्यंत….

कोरोना रुग्ण सापडला तर त्याभागाचे google mapping करून containment Zone तयार करून त्या भागाचे सर्व्हे करणाऱ्या आरोग्य सेवक पोलीस या सर्वांच्या पोटापाण्याची काळजी घेण्यापासून ते यावेळी देखील लोकांनी माहिती देण्यात टाळाटाळ करू नये म्हणून विविध मार्गाचा अवलंब करून खरी माहिती काढण्यासाठीआवश्यक उपाय योजना करेपर्यंत …..

विजपडून मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यापासून तर घर जळाले म्हणून उघड्यावर आलेल्या लोकांच्या पोटापाण्याची सोय करीत आधार देण्यापर्यंत…
विविध संघटना आणि लोकांनी केलेली मदत गरजवंतापर्यत पोहोचवण्यापासून ते अशा काळातही काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करेपर्यंत….

ह्या आणि अशा अनेक अत्यंत महत्वाच्या पण कदाचित लगेच न दिसून येणाऱ्या कामांची यशस्वी पूर्तता सर्व महसुली अधिकारी आणि कर्मचारी यांचेकडून अनेकदा काळ वेळेचे भान न ठेवता केली जाते….. आणि म्हणूनच जेव्हा शासकीय निर्णयाप्रमाणे काम सुरळीत होते तेव्हा त्यात महसूलचे फार मोठे योगदान असते आणि ते कधीही नाकारता येणे शक्य नाही

स्थानिक पातळीवर लोक महसूल अधिकारी कर्मचारी यांचेकडे प्रत्यक्ष शासन म्हणून बघतात आणि त्यांच्याकडून असंख्य अपेक्षा ठेवतात ….त्यामुळे आपले कुठेही नाव नाही म्हणून नाराज न होता शक्य तेवढ्या अपेक्षांची पूर्तता करणे यातच महसुलचे सौख्य सामावले आहे.

….. आणि म्हणूनच देहभान विसरून कर्तव्य पूर्ततेसाठी राबणाऱ्या माझ्या सर्व महसुल अधिकारी व कर्मचारी यांना मानाचा मुजरा…