Spread the love

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई – डॉ ढाकणे

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 7 – कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता राबविण्यात येणा-या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण जळगाव जिल्हयामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान काही सामाज विघातक गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश अथवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा अफवा पसरवत आहेत. तसेच करोना बाधित व्यक्तीची संख्या त्याच्यावरील उपचार याबाबत कोणतीही खातर जमा न करता माहिती / बातमी सोशल मिडीया/ विविध प्रसार माध्यमांमध्ये पसरवत आहे. त्यामुळे समाजात अकारण भिती उत्पन्न होत आहे.
अशा प्रकारे पसरविल्या जाणा-या या संदेश /बातमी/ अफवांमुळे सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असून अशा घटनांवर अंकुश ठेवण्याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 7 एप्रिल, 2020 पासून पुढील आदेश होईपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू करीत आहे.
कोरोनासंबंधी औषधोपचार विषयी अंधश्रध्दा निर्माण करणा-या अथवा अधिकृत मान्यता नसलेल्या कोणत्याही बाबी, तसेच धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करणा-या, जनतेमध्ये अकारण भयाची भावना निर्माण होईल अशा प्रकारच्या कोणत्याही बाबी अधिकृत स्त्रोतांकडून खातरजमा न करता कोणीही अनधिकृत माहिती परस्पर कोणत्याही प्रकारे प्रसारित करणार नाही
सोशल मिडीया/ एसएमएस/ व्हॉटसॲप / फेसबुक/ Twitter/ टिकटॉक/ हॅलो/ टेलिग्राम अथवा इतर कोणत्याही प्रसार माध्यमांव्दारे दोन समाजात जातीय तेढ / धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश/ साहित्य/चित्रफित व तत्सम बातमी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारीत करणार नाही.
सोशल मिडीया/ एसएमएस/ व्हॉटसॲप / फेसबुक/ Twitter/ टिकटॉक/ हॅलो/ टेलिग्राम अथवा इतर कोणत्याही नेटवर्किग प्लॅटफार्मचे ग्रुप ॲडमिन हे आपल्या ग्रुपमधील कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश/साहित्य/चित्रफित प्रसारणासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार राहतील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.