Spread the love

मित्रहो आपण कालच दिनांक ०१ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला. खरं पाहिलं तर आपला महसूल विभाग हा “जिंदगी के साथ भी,जिंदगी के बाद भी” असाच जनतेशी नाळ जोडलेला विभाग आहे. या दिनाच्या निमित्ताने आपले ई फेरफार प्रणालीचे प्रशिक्षक श्री सचिन जगताप भाऊसाहेब ,मंडळ अधिकारी,तालुका यावल जि. जळगाव यांनी या विभागात काम करतांना त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अंनुभावातून आपले मनोगत व्यक्त केले आहे. वाचा त्यांच्याच शब्दात 

महसूल दिनाच्या निमित्ताने
महसूल विभाग हा शासनाच्या सर्व विभागाचा एक समन्वयक म्हणून मध्यवर्ती विभाग म्हणून काम करतो .एक संवेदनशील,जिगरबाज, आणि चपळ विभाग म्हणून या विभागाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
       कुठतरी पहाडात राहाणाऱ्या व्यक्तीला मतदानकार्ड देऊन आपण त्या व्यक्तीची ओळख निर्माण करतो.

मात्र हे करत असताना आपण त्या व्यक्तीला शिधापत्रिका देऊन धान्य देऊन खरी संवेदना जपत असतो.

संवेदना ही केवळ इतकीच असते का?

आधारवड योजना ,उभारी योजना,अर्थसहाय्य योजना आदि  योजनांच्या माध्यमातून आपण लोकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो.
     मला आठवते उभारी योजनांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी  कुटूंबियांना भेटी देत असताना

घरातला कर्ता पुरुष गेल्याने मुलीच्या लग्नाचा आ वासून उभा राहिलेला प्रश्न त्या माऊलीच्या तोंडावर मी पाहिला आहे.

स्वतच पोटचचं लेकरु दुर्धर आजाराने आजारी असताना त्याच्या दैनंदिन औषधाला पैसेच नसणारी ती अगतिक झालेली आई मी पाहिली आहे.

कर्ता पोरगा गेला आई घरात एकटी.खायचं काय हा प्रश्न घेऊन दादा काही किराणा देता येईल का अशी ह्रदयाला हाक घालणारी ती आई पाहिली आणि तिला या विभागात काम करत असल्यामुळे काहींना काही मदत देता आली या गोष्टीच  समाधान लाभलं. अजूनही बरंच काही आहे सांगण्यासारखं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवोत्तर काळात महसूल विभागाच्या माध्यमातून अजूनही जनसेवा,देशसेवा घडली तर जन्म सार्थकी लागल्याचे समाधान लाभेल. 

तूर्तास इथेच थांबतो 

जय हिंद ! जय महाराष्ट्र दिनांक ०१/०८/२०२२