Spread the love

   सध्या फैजपूर ता.यावल येथे मंडळ अधिकारी पदावर कर्तव्यावर असलेले जनार्दन बंगाळे भाऊसाहेब यांनी लोकसहभागातून तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांच्या नूतनीकरणाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबविलेला आहे. बहुविध जनतेशी जनसंपर्क असलेले  मंडळ अधिकारी पदाचा उपयोग त्यांनी  जनतेच्याच सोयीसाठी असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण/सुशोभिकरण करण्याच्या  कामी केला . त्यांचे  हे काम  अतिशय कौतुकास्पद असे असून इतर तलाठी/मंडळ अधिकारी बंधू भगिनींना निश्चितच प्रेरणादायी असे आहे. तर भाऊसाहेब व त्यांच्या टीम ची यशोगाथा वाचा त्यांच्याच शब्दात … ! 

 

“गाव करी ते राव काय करी ” यशोगाथा भाग – १

  काही दिवसापुर्वी मी न्हावी प्र.यावल ता.यावल येथील तलाठी कार्यालयाचे लोकसहभागातून केलेले नुतनीकरण याबाबत गाव करी ते राव काय करी ” यशोगाथा भाग – २ ” लिहिली होती. न्हावी तलाठी कार्यालयाचे नुतनीकरण करण्यापुर्वी आमच्या मंडळ मुख्यालयाचे कार्यालय म्हणजे फैजपूर तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाचे वाल कंपाउंड व वृक्षलागवड करण्याचा उपक्रम सुद्धा आम्ही लोकसहभागातून राबवला होता. आणि त्याला जनतेने दिलेला प्रतिसाद निश्चितीच प्रेरणादायी व उर्जादायी होता….त्यानिमित्ताने

फैजपूर तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय म्हणजे अगदी फैजपूर या ऐतिहासिक गावाच्या मध्यवस्तीत असलेले सरकारी कार्यालय. कार्यालयाची स्वतःची जागा.साधारणपणे क्षेत्रफळ 400 चौमी.त्यात कार्यालयासाठी दोन खोल्या. त्या दोन्ही खोल्यांचे नूतनीकरण व सुशोभीकरण माझ्या पूर्वीचे मंडळ अधिकारी श्री.रशीद तडवी भाऊसाहेब व तलाठी श्री.एफ.एस.खान आप्पा यांनी पुढाकार घेउन पूर्ण केले होते. त्यामुळे बाहेरचा परिसर सुशोभीत करण्याचा मानस कार्यभार स्वीकारल्या पासून मनात होता.
कारण जेव्हा मी पहिल्यांदा कार्यालयाच्या आवरात पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी आलो तेव्हा प्रथम दर्शनी इथे सरकारी कार्यालय आहे असे वाटतच नव्हते कारण त्या सरकारी जागेचा काही भाग बैल गाडी लावण्यासाठी,काही भाग पार्किंग म्हणून गाड्या लावण्यासाठी तर काही भाग हा कचरा टाकण्यासाठी वापरला जात होता.
मी कार्यभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार सो श्री.कुंदन हिरे साहेब म्हटले कि बघ बाबा तुला यात काही सुधारणा करता आली तर कर.यापूर्वीही मी नमूद केले आहे कि महाराष्ट्रातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी यांना स्वतःचे कार्यालय नाही. ज्यांना कार्यालय आहे ते सुस्थितीत नाही. तसे पाहिले तर महसूल प्रशासन अधिकाराचा उपयोग करून इतर सरकारी कार्यालयासाठी सहजपणे शासकीय जागा उपलब्ध करून देतात तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतुदही केली जाते.असे असताना सुद्धा महसूल विभागाच्या शेवटच्या टोकाला कामकाज करणाऱ्या तलाठ्याला हक्काचे कार्यालय नाही आणि जिथे कार्यालय आहे ते सुस्थितीत नाही.ही वस्तुस्थिती आहे….असो.
या बाबींचा विचार करून पुढाकार घेउन लोकसहभागातून कार्यालयाची सुशोभीकरण करण्याचा मानस आम्ही सर्वानी घेतला.
कार्यभार स्विकारण्याच्या बरोबर एका वर्षाने फैजपूर शहरातील काही मान्यवर दानशूर मंडळीची भेट घेउन त्यांना मदतीचे आवाहन केले.अवाहनाला प्रतिसाद म्हणून फैजपूर मधील दानशूर मंडळीनी मदत देण्यास सुरुवात केली आणि आम्ही वाल कंपाउंडच्या कामाला सुरुवात केली. यासाठी मला माझे सहकारी तलाठी श्री. एफ.एस.खान,एम.पी.खुर्दा,लीना राणे,स्मिता कोळी,संजु राजपूत,देवानंद तायडे,श्री.तायडे गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.मे २०१९ मधे वाल कंपाउंडचे कामकाज पूर्ण झाले.
त्यानंतर या परिसरात झाडे लावण्यासाठी आमची धडपड सुरु झाली. यासाठी माझ्या मंडळातील सर्व कोतवाल बांधवांनी खड्डे खोदणे,माती आणणे इत्यादी कामासाठी मदत केली आणि ०१ जुलै २०१९ रोजी आम्ही कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड केली आणि कोणत्याही परिस्थिती झाडे जगवण्याचा निर्धार केला. यासाठी फैजपूरचे नविन तलाठी श्री.प्रशांत जावळे यानी हिरीरीने पुढाकार घेतला. झाडे लागली.पाहता पाहता झाडे वाढण्यास सुरुवात झाली …. पावसाळा संपला आणि आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला तो म्हणजे झाडांना पाणी कसे द्यायचे. सुरुवातीला आम्ही शेजारी पाजारी यांच्याकडुन पाणी घेतले परंतु दर आठ दिवसाला तसे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही नगरपालिका फैजपूर यांचे सहकार्य घेण्याचे ठरवले. नगरपालिकेने सुद्धा आम्ही जेव्हा जेव्हा मागणी करू तेव्हा तेव्हा पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले. तसेच वेळेप्रसंगी फैजपूरातील खाजगी लोकांनी सुद्धा आम्हाला टॅंकर उपलब्ध करून दिले. पाण्याचे टॅंकर मागवणे,झाडाला पाणी टाकणे इत्यादी गोष्टीसाठी फैजपूर तलाठी श्री.प्रशांत जावळे आप्पा, फैजपूर कोतवाल श्री.तुषार जाधव,संजय राजपूत,देवानंद तायडे यांनी मोलाची भूमिका निभावली . कारण एप्रिल मे च्या उन्हाच्या तडाख्यात झाडे जगवण्यासाठी खरोखरच तारेवरची कसरत करावी लागली आणि ती ह्या मंडळीनी केली.

       या काळात एक वाईट अनुभव सुद्धा आला . आम्ही लावलेल्या झाडाचे वैभव कोणाच्या तरी मनात सलत होते…. अश्या व्यक्तीने आम्ही लागवड केलेली चार झाडे तोडून टाकली परंतु त्याला न डगमगता झाडे वाढवण्यासाठी आम्ही आमची धडपड कायम सुरु ठेवली. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय फैजपूरचा परिसर अत्यंत प्रसन्न व निसर्गरम्य वाटतो आहे. याचे सर्व श्रेय जाते ते फैजपूरातील दानशूर मान्यवरांना.

            मागील एका तपापासून महसूल विभागात तलाठी या पदावर कामकाज करत आहे. त्यातील १० वर्ष तलाठी म्हणून कामकाज केले व सद्यस्थितीत २ वर्षापासुन पदोन्नतीने मंडळ अधिकारी म्हणून कामकाज करत आहे. या काळात एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे जसे पेराल तसे उगवेल. कामकाज करत असताना बहुसंख्य लोकांशी संपर्क तर आलाच परंतु मोठ्याप्रमाणावर जिव्हाळ्याचे लोक सुद्धा जोडले गेले.आणि अश्याचा मंडळीच्या सहकार्याने आम्ही कार्यालयाच्या परिसराचा कायापालट करू शकलो.
झाडे जगवण्यासाठी श्री.जावळे आप्पा यांनी सक्रिय पुढाकार घेतला. महत्त्वाचे म्हणजे तलाठी पदाचे नियमित कामकाज सांभाळून जावळे आप्पा व त्यांचे सर्व सहकारी यांनी झाडांची देखभाल केली.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावातील दानशूर मंडळीनी जी मदत केली त्यामुळेच हे शक्य झाले. सर्व दानशूर मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻
यानिमित्ताने गाव करी ते राव काय करी याची प्रचिती आली.

 

जे.डी.बंगाळे

मंडळ अधिकारी फैजपूर .यावल जिल्हा जळगाव