Spread the love

प्रशासनातील सर्व घटकांनी जर ठरविले तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत  प्रशासकीय मदत तत्परतेने व तळमळीने   कशी पोचविता येते याचे उदाहरण नुकतेच रावेर तालुक्यात अनुभवास आले. त्याचा अनुभव त्या भागाचे मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे भाऊसाहेब यांचेच शब्दात……

“अनुभव एका प्रशासकीय तत्परतेचा ……..सरकारी काम आणि सहा महिने थांब याला वाक्याला छेद देणारा !

घटना होती दिनांक 23 जुन 2022 रोजीची.वेळ साधारणपणे संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमाराची होती.मला मंडळातील तलाठी श्रीमती कुर्शाद तडवी यांचा फोन आला की जानोरी येथे विज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. जानोरी म्हणजे सातपुड्याच्या कुशीत वसलेले 100 % आदिवासी बहुल गाव.बहुतांश लोक मजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात.
त्याच क्षणाला मी जानोरी कडे जाण्याचा निर्णय घेतला. जाताना मनात खुप सारे विचार येत होते कसे झाले असेल,तरुणांचे वय कीती असेल,घरात इतर मंडळी कोण असतील….?
तिथे पोहचल्यानंतर गावातील लोकांना प्रशासना तर्फे कोणी तरी आले आहे यामुळे जरा बरे वाटले.आणि त्या तरुणाबद्दल,त्याच्या कुटुंबाबद्दल जी माहिती मिळाली ती ऐकूनच धक्का बसला.
तरुणाचे नाव होते मुकंदर कलींदर तडवी… वय 21 वर्ष.. काही वर्षापुर्वी वडील मयत झालेले. मुकंदर ला तीन बहिणी आणि आई.मुकंदर एकुलता एक.काही दिवसातच साखरपुडा होणार होता. कुटुंबाचा एकमेव आधार.
मुकंदर जळगांव येथे खाजगी नोकरी करायचा परंतु तीन-चार दिवसापूर्वीच तो गावी म्हणजे जानोरी येथे आला होता.आईला मदत व्हावी म्हणून सरपण गोळा करण्यासाठी तो सातपुड्यात गेला होता. आणि त्याच वेळी निसर्गाने त्याच्यावर आघात केला.विज पडून मुकंदर मृत पावला होता.घरची परिस्थिती अत्यंत बेताची . त्यातच पोटचा एकुलता एक तरुण मुलगा,भविष्याचा सहारा काळाने हिरावून नेल्याचे दुख त्या माऊलीला पेलवत नव्हते. घटना आणि प्रसंग ह्रदय हेलाउन टाकणारा होता.
हे सर्व चित्र पाहून त्यावेळी मनाशी निश्चय केला की कै.मुकंदरच्या कुटूंबातील सदस्याना त्यांच्या हक्काची शासकीय मदत मिळवून द्यायची.खर तर गेलेल्या जिवाचा मोबदला आर्थिक मदत ठरू शकत नाही.परंतु होणारी अप्रिय घटना,हानी होवून गेली आहे,कुटुंबाचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या हक्काची जी काही शासकीय मदत असेल ती त्यांना मिळवून देणे आवश्यक होते.
याबाबत गावातील मंडळीना मुकंदरचे पीएम करायला सांगितले. त्यांनीही त्याबाबत तात्काळ हालचाली सुरु केल्या.त्यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.इंगोले साहेब व त्यांच्या कर्मचारी वर्गानेही सहकार्य केले. विज पडून दुर्घटना झाल्याबद्दल तलाठी श्रीमती तडवी यांनाही तात्काळ तहसील कार्यालयात अहवाल सादर करायला सांगून मी स्वतः सदर घटना फोन वरुन मा.तहसीलदार व मा.निवासी नायब तहसीलदार यांना अवगत केली.
साधारणतः दोन दिवसापूर्वी कै.मुकंदर चा पीएम रिपोर्ट आला आणि तो तलाठी यांनी तहसील कार्यालयात जमा केला. सदर रिपोर्ट लवकरात लवकर मिळावा यासाठी मा.तहसीलदार सो स्वतः पाठपुरावा करत होत्या त्यामुळे पीम रिपोर्ट आल्या आल्याच मा.तहसीलदाराचे श्रीमती देवगुणे मॅडम यांनीही सदर संवेदनशील विषयाचे गांभीर्य लक्षात घेउन तात्काळ र रु 400000/-( अक्षरी :- चार लक्ष रुपये) चा चेक तयार करून आज (07.07.2022) जानोरी या गावात येउन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते सदर चेक कै.मुकंदरच्या आईच्या स्वाधीन केला.
विशेष म्हणजे यासाठी मुकंदरच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा अर्ज करायची,कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची,कोणत्याही कर्मचारी-अधिकारी यांना भेटण्याची गरज पडली नाही. आज मुकंदरला जाऊन 15 दिवस झाले.त्याच्या मृत्यू नंतर केवळ 15 दिवसात त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देउ शकलो याचे समाधान वाटले.
यासाठी गावातील श्री.तडवी सर,पोलीस पाटील,तलाठी श्रीमती तडवी मॅडम,ग्रामसेवक श्री.तडवी भाऊसाहेब.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. इंगोले साहेब यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे मा.तहसीलदार सो यांची तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी यांची तत्परता खरोखरच दाद देण्यासारखी आहे. त्यामुळे ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.!

जे.डी.बंगाळे
मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल